Tuesday 6 March 2018

'आपण' यांना पाहिलंत का?

मराठीत दोन प्रकारची अनेकवचनी प्रथमपुरुषी सर्वनामं आहेत. आम्ही आणि आपण. इंग्रजीत त्यांचं वर्णन exclusive we नि inclusive we असं करतात. हे मला माहीत होतं. पण त्याचं अधिक चपखल वर्णन मराठीतूनच करायचा प्रयत्न करत होते. ते काहीसं असं झालं :

आम्ही :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा एक भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहे, त्याला वा त्यांना ती आपल्या गटाचा एक भाग मानत नाही.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलताना स्वतःच्या गटाला उद्देशून 'आम्ही' हे सर्वनाम वापरते.
4) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आम्ही'. द्वितीयपुरुषी सर्वनाम 'तू' किंवा 'तुम्ही' आहे. आम्ही आणि तू / तुम्ही हे दोन गट इथे स्पष्ट विभागलेले आहेत. त्या दोन गटांमध्ये निदान या वाक्यापुरता तरी कोणताही सामायिक भाग (overlapping section) नाही.

आपण :
1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या गटाचा भाग मानते आहे.
2) ती व्यक्ती ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोलते आहे, त्याला वा त्यांनाही ती आपल्या गटाचा एक भागच मानते.
3) अशी व्यक्ती आपल्या गटाबद्दल त्या दुसर्‍या व्यक्तीशी वा व्यक्तींशी बोलते आहे.
4) दुसरी व्यक्ती वा दुसर्‍या व्यक्तीही बोलणार्‍या व्यक्तीच्या गटातच मोडत असल्यामुळे, बोलण्याचे स्वरूप हे असं आहे  : गटातील व्यक्ती-गटाबद्दल-गटातील व्यक्तीशी -> गट-गटागटाबद्दल-गटाशी. 
5) या संभाषणात प्रथमपुरुषी सर्वनाम अनेकवचनी आहे. ते म्हणजे 'आपण'. द्वितीयपुरुषी सर्वनाम कोणतं आहे इथे? तेही 'आपण'च! बोलणारी व्यक्ती आणि ऐकणारी व्यक्ती वा ऐकणार्‍या व्यक्ती या दोन गटांमध्ये इथे स्पष्ट विभाजन नाही. जणू मी माझ्याशीच माझ्याबद्दलच बोलते आहे असा भाव. कारण या दोन गटांमध्ये स्वच्छ जाणवणारा सामायिक भाग (overlapping section) आहे.

तर - असं आपलं आपल्यापाशीच (!) समजून घेताना, मला साक्षात्कार झाला की आपण हे सर्वनाम फक्त प्रथमपुरुषी नाही, ते द्वितीयपुरुषीही आहे!

आता हे तपासून पाहणं आलं. यासाठी लगोलग दोन सोप्या चाचण्या आठवल्या. प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी सर्वनामाच्या व्याख्येची एक. आणि आज्ञार्थाची दुसरी.

वक्ता किंवा लेखक स्वतःकडेच निर्देश करण्यासाठी ज्या सर्वनामाचा उपयोग करतो ते प्रथमपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम प्रथमपुरुषी झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये बोलणारी व्यक्तीही गृहीत आहे.) ज्याच्याशी वक्ता बोलतो किंवा ज्याच्यासाठी लेखक लिहितो, त्याला उद्देशून असलेलं सर्वनाम ते द्वितीयपुरुषी. या निकषानुसार आपण हे सर्वनाम द्वितीयपुरुषीही झालं. (आपण [सगळे] जेवायला जाऊ या का? -> 'आपण'मध्ये ज्याच्याशी वा ज्यांच्याशी बोललं जातं आहे, ती वा त्या व्यक्तीही आहेत.) म्हणजे ही चाचणी यशस्वी.

आज्ञार्थ किंवा ऊआख्यात ज्याला म्हणतात, त्यात द्वितीयपुरुषी आणि क्वचित प्रथमपुरुषी सर्वनामांना उद्देशून केलेलं बोलणं असतं. हे बोलणं सहसा आज्ञा, सौम्य आज्ञा, इच्छा आणि मग आज्ञा अशा प्रकारांत मोडतं. या निकषानुसार प्रथमपुरुषी आणि द्वितीयपुरुषी आज्ञार्थी वाक्यं तयार करून पाहिली.
1) आता हा पुढच्या पानावरचा तक्ता पाहा. (तू या द्वितीयपुरुषी सर्वनामाला उद्देशून)
2) हां पोरींनो, जपून. मध्ये हलका उतार आहे, अशा इकडून चला. (तुम्ही या द्वितीयपुरुषी अनेकवचनी सर्वनामाला उद्देशून)
3) पण श्री. फडके, असं काय करता, तुम्ही मला एकदा फोन नाही का करायचात? (तुम्ही या द्वितीयपुरुषी एकवचनी - आदरार्थी सर्वनामाला उद्देशून)
4) महाराज, आपण परवानगीसाठी थांबायची गरज नाही, चला. (आपण या द्वितीयपुरुषी एकवचनी अत्यादरार्थी (;-)) सर्वनामाला उद्देशून)
5) झालं लिहून? आण इकडे. पाहू बरं. (इथे 'आण' हे 'तू' या द्वितीयपुरुषी एकवचनी सर्वनामाला उद्देशून आहे, तर 'पाहू' हे नक्की कुणाला उद्देशून आहे, ते लगेच ठरवणं जड जातं. पण थोडा विचार केला की लक्ष्यात येतं, ते स्वतःला उद्देशून - अर्थात प्रथमपुरुषी सर्वनामाला उद्देशून आहे.)
6) असं करू, येत्या शनिवारी पहाटेच निघू, म्हणजे उन्हाच्या आत पोचता येईल. (इथे 'करू' आणि निघू' ही दोन्ही क्रियापदं बोलणार्‍या व्यक्तीलाही उद्देशून आहेत (प्रथमपुरुषी) आणि ज्यांच्याशी बोलणं होतं आहे, त्या व्यक्तीला वा व्यक्तींनाही (द्वितीयपुरुषी) उद्देशून आहेत. हे दोन्ही पुरुषांसाठी लागू असणारं अध्याहृत सर्वनाम आहे - आपण.) अर्थात, इथे असा वाद संभवू शकतो, की जरी 'आपण'मध्ये 'मी' आणि 'तुम्ही' हे दोन्हीही अंतर्भूत असलं, तरीही बोलणारी व्यक्ती स्वतःचा वाढीव भाग म्हणून या गटाचा निर्देश करते आहे, आणि त्यामुळे 'आपण'चं वर्गीकरण करताना ते प्रथमपुरुषात केलं पाहिजे. त्याचा प्रतिवाद असा : दोन्ही पुरुषांचा सहभागाबद्दल मतभेद तर नाहीच. मग कोणता पुरुष प्रबळ 'भासतो' ते ठरवून दुसर्‍या पुरुषाची हकालपट्टी का करावी? दोन्ही पुरुषांचा अंतर्भाव 'inclusive आपण'मध्ये आहे, असं का म्हणू नये?

इथे साक्षात मोरो केशवांची साक्ष काढावी म्हणून 'शास्त्रीय मराठी व्याकरण' उघडलं, तर ते म्हणत होते - स्वतः आणि आपण या दोन सर्वनामांना स्वतःचा पुरुष असा नाहीच.

स्वतः हे कायम कोणत्या ना कोणत्या सर्वनामाला लागून येतं आणि त्या सर्वनामाचा पुरुष धारण करतं. उदाहरणार्थ - मी स्वतः उठून रांधीन तेव्हा मुखी घास पडायचा! किंवा, त्यांनी स्वतःच मला तसं सांगितलं, खोटं कसं असेल? (तर हे बरोबरच. पण यावर विचार करताना मला आणिक एक उदाहरण सुचलं - आपण स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आता इथे पुरुष कुठला हो धरायचा दामले आजोबा?!)

या सर्वनामांना पुरुष नाहीच असं म्हणणं जर तांत्रिकदृष्ट्या स्वीकार्य आहे, तर मग त्यांचं वर्गीकरण त्या-त्या सगळ्या पुरुषांत केलं म्हणून चुकलं कुठे?

खेरीज 'आपण'चे फक्त प्रथमपुरुषी एकवचनी (पक्या स्वतःशी विचार करू लागला, आपण इतकं केलं टवळीसाठी, तरी ही बेवफा ती बेवफाच!), प्रथमपुरुषी अनेकवचनी ("होय की, आपण मर मर मरावं, तेव्हा कुठे मालकाचं समाधान होणार..." लक्ष्मीचं म्हणणं त्या सगळ्यांच्याच मनात घर करून होतं.), द्वितीयपुरुषी अत्यादरार्थी एकवचनी वा अनेकवचनी ("राजे, आपण आमच्या घरी आलात, आम्ही धन्य झालो!") उपयोग आहेतच.

चिटवळपणा करायचा, तर 'आपण'चा खोचक आदरार्थी वापर (मधोबा, आपण 'शहाणे' आहात झालं. निघा!) आहेच. पण तो द्वितीयपुरुषीच म्हणायचा.

झालंच, तर 'खुद्द' या शब्दाचा विचार दामल्यांनी केलेला दिसत नाही. संस्कृतकेंद्री विचार करण्याच्या पद्धतीचा तो परिणाम असावा. पण 'खुद्द' हेही एक 'स्वतः'ला समांतर असं सर्वनाम आहेच. तेही मुख्य सर्वनामाला जोडूनच येतं. फक्त त्याची जागा मुख्य सर्वनामाच्या आधी आलेली दिसते. उदाहरणार्थ,
- तिनं स्वतः उठून पाणी शेंदलं.
- खुद्द ती उठली, तेव्हा कुठे काम झालं.
पुढे-मागे या 'खुद्द'चीही तक्त्यात जिरवणी करणे आहे, ही नोंद. 

अखेरीस तक्ता केला, तो काहीसा असा :


काही चूकभूल दिसत असेल तर सांगा. सुधारणा करता येईल. बाकी या निमित्तानं लक्ष्यात आलेली गोष्ट, मोरो केशव दामले आजोबांच्या 'शास्त्रीय मराठी व्याकरणा'चं काळानुरूप पुनर्लेखन कुणीतरी करायला हवं आहे.

टिपा :
1. ए सेन मॅन आणि धनंजय यांच्याशी झालेल्या चर्चेमुळे या टिपणात मोलाची भर पडली आहे. दोघांचेही आभार.
2. या सर्वनामांमध्ये प्रश्नार्थक सर्वनामांचा विचार केलेला नाही. तो स्वतंत्रपणेच केलेला सोयीचा जाईल.