Wednesday 6 September 2023

मराठी नट्या ०३

सगळ्यांत पहिल्यांदा तिला कधी पाहिलं हे आता मला नीटसं आठवत नाही. अर्थात, मुक्ताला ही दाद वाटणं शक्य नाही. तिला बघावं आणि ती लक्ष्यात राहू नये, अशी तिच्या अभिनयाची शैलीच नाही. चार्म्स आणि हेक्सेस आणि स्पेल्सची आतिषबाजी करत एखाद्या जादुगारणीनं एखाद्या द्वंद्वात एंट्री घ्यावी, तशी तिची शैली. भक्ती बर्वेंना बघताना मला कायम मुक्ताची आठवण येत आली आहे. हे वाक्य उलट असायला हवं, ना? आय नो. पण मी भक्ती बर्वेंना रंगमंचावर बघितलेलं नाही. आणि माझ्या डोक्यात मुक्ताच इतकी 'छाई हुई' आहे, की आहे बाबा हे असंच, उलट. तर – भक्ती बर्वेंच्या अभिनयात ही एक "बघ हं, आता मी कशी गंमत करणार आहे!" असं सांगणारा एक सूक्ष्म पण झगझगीत धागा आहेसा मला वाटतो. अचूक तीच छटा मुक्ताच्या कामात आहे. त्यामुळेच तिचं 'चारचौघी'तलं काम बघायला जाण्यापूर्वी मी किंचित धास्तावले होते. पण... छे! हे पुष्कळ पुढचं.

तर – तिला अगदी सुरुवातीला पाहिल्याचं आठवतं, ते टीव्हीवर. 'पिंपळपान'मध्ये सानियाच्या 'आवर्तन'वर आधारित असलेल्या कथानकात – स्वरूप या काहीशा बोल्ड, अमेरिकेत वाढलेल्या बहिणीच्या भूमिकेत. स्वरूपचा प्रॅक्टिकल आणि प्रेमळ सूर तिनं अचूक पकडला होता. पण त्या भूमिकेत काही मेस्मरायझिंग नव्हतं. उलट त्याआधी 'घडलंय बिघडलंय'मध्ये ती आणि आतिशा नाईक पाणवठ्यावर जाणार्‍या दोन गावरान बायकांची सोंगं काढत असत. त्यात आतिशा नाईक वयाला साजेसं लुगडं नेसून असे. तर मुक्ता – गावातल्या सेमी-तरुण पोरी परकर नेसून त्यावर शर्ट घालतात, तसल्या अवतारात. शर्ट आणि परकर, कमरेवर घागर, घट्ट वळलेल्या वेणीला रिबीन, तरी लटा काढलेल्या. आणि दोघींच्याही चेहर्‍यावर अत्यंत बेरकी – स्मार्ट – मापंकाढू भाव. ती आणि आतिशा अक्षरशः हैदोस घालायच्या त्यात. मग तिचं संजय मोने आणि जितेंद्र जोशीबरोबरचं 'हम तो तेरे आशिक है' पाहिलं होतं. त्यात ती मुस्लीम मुलीच्या भूमिकेत होती. जितू आणि मुक्ता दोघं एकत्र असतील, तर काय होईल, अशा कल्पनेनं चेकाळून नाटकाला गेलेल्या मला, तितकीशी मजा आली नव्हती. त्यात नाटकाचा भाग होता, तसा 'मुक्ता जरा स्वतःच्या प्रेमात आहे का?' अशी शंका चाटून जाणंही होतं. ती पहिली धोक्याची सूचना. पण ती कायम धक्के देतच राहिली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' नावाची (बहुधा सतीश राजवाडेची) मालिका होती. त्यात तिनं तिच्या 'मुंबई पुणे मुंबई'मधलाच, शहरी, लग्नानंतरच्या तडजोडींना बिचकणार्‍या आधुनिक मुलीचाच पार्ट कंटिन्यू केला होता. पण काय लाजवाब केला होता! स्वप्नील जोशी आणि ती यांचे प्रसंग दोन चांगले नट एकत्र आले की व्हायचेच, तितपत चांगले व्हायचे. पण तिच्या वडलांच्या भूमिकेत असलेल्या विनय आपटेंबरोबर?! काहीच्या काहीच केमिस्ट्री. आईवेगळी, एकुलती एक लेक. तिला तिचा बाप लग्नाआधी पोळ्या करायला लावतो असा एक प्रसंग होता. कधीही स्वैपाकाला हात न लावलेल्या मुलीचं अशा वेळी जे होईल तेच तिचं होतं. त्यात बापाची दंडेली. पण बापावर प्रेम आहेच. त्या सगळ्यानं उडणारा तिचा भडका, फ्रस्टेशन, बापाच्या बोलण्यात काहीतरी रास्त असल्याचा भाव, चिडचिड, रडू कोसळणं.... हे सगळं अक्षरशः अ – फा – ट होतं. विनय आपटेंना दाद द्यावी की तिच्याकडे बघावं हे न कळून चिडचिड झाली होती माझी, इतकी खास त्यांची केमिस्ट्री. 'कबड्डी कबड्डी'मधलं तिचं काम कबड्डीपटू मुलीचं. विनय आपटे बापाच्या भूमिकेत. दारुड्या भावाचं कबड्डीचं वेड नि त्यातून झालेली त्याची फरफट सोसणारा तो माणूस कबड्डीच्या पूर्ण विरोधात. त्यातून झालेली पोरीची नि बापाची जुगलबंदी होती त्यात. एखाद्या खेळाडूचेच असावेतसे न ठरणारे पाय, अंगातली न संपणारी ऊर्जा, उसळतं बंड... असं सगळं असलेली ती भूमिका मुक्तानं कहर केली होती. तीनेकदा तरी मी ते नाटक पाहिलं. तसंच 'फायनल ड्राफ्ट'ही. ते तर तिचं 'घरचं' नाटक. ती, मिलिंद फाटक, रसिका, नि गिरीश जोशी स्ट्रगलच्या काळात एकत्र राहत म्हणे. त्यामुळे तिचं गिरीशबरोबर ट्यूनिंग असणार यात शंका नव्हतीच. त्यातलीही भूमिका अशीच खास. गावातून आलेली, थापेबाज, बेरकी, पण अंगात लिहायचा किडा असलेली, काहीतरी सच्चं सांगण्याजोगं जवळ असलेली तरुण मुलगी. तिचा बनचुका, आयुष्याचं दार लावून कोरडा झालेला, जगण्यातला रस हरवून गेलेला शिक्षक. त्या दोघांच्यातली देवाणघेवाण होताना ठिणग्या उडाल्याचा भास होई. त्या नाटकाच्या एका प्रयोगात अत्यंत इंटेन्स प्रसंग चालू असताना प्रेक्षकांतलं कुणीतरी बोलायचं थांबेचना. शेवटी गिरीश जोशी बेअरिंग सोडून, थांबून, थेट तिकडे बघून म्हणला, "हे असं नाही चालू शकत. मी थांबतोय. तुम्ही बाहेर जा. मगच मी सुरू करीन." त्यात एक फायनॅलिटी होती. त्या बाई बाहेर पडल्या. त्यात दहा मिनिटं तरी गेली असतील. तोवर मुक्ता तिच्या भांबावलेल्या-चिडलेल्या-हट्टी मुद्रेत तशीच्या तशी पुतळा होऊन थांबलेली. "हां, सुरू करू." या गिरीश जोशीच्या एका वाक्यासरशी फ्रीज केलेली फ्रेम सुरू व्हावी, तशी सुरू. मी नाटकाइतकीच या हुकुमतीच्या दर्शनानं अवाक झाले होते.

नंतर तिला पाहिल्याचं आठवतं ते 'एक डाव धोबीपछाड' या वाह्यात सिनेमात. त्यात ती अशोक सराफांनी रंगवलेल्या एका श्रीमंत बापाची आईवेगळी लेक होती. नसलेल्या आईचा वास्ता देऊन, बापाला कसं गुंडाळायचं याचं रामबाण शास्त्र बनवणारी ती पोरगी. तिच्या बोलण्यातला गावरान लहेजा, छानछोकीची हौस असल्यानं नि तंत्रज्ञानाच्या एक्स्पोजरमुळे आलेले चुकीच्या उच्चारांतले इंग्रजी शब्द नि त्यातला स्टाईलमारूपणा, बेरकीपणा... एकुणात तर्‍हतर्‍हेच्या पुरुषांना खेळवण्यातलं कौशल्य नि ते आपल्याकडे आहे याचं भान... असं सगळं त्या कामात ठासून भरलेलं होतं. अशोक सराफांबरोबरचे तिचे प्रसंग बघणं म्हणजे... काय टायमिंग, काय प्लेसिंग, काय सफाईदार मेळ... असो. याबद्दल मी कितीही वेळ बोलू शकीन. दुसरी अशीच भूमिका म्हणजे तिचं 'जोगवा'मधलं उपेंद्र लिमयेबरोबरचं काम. केसांत जट आल्यामुळे देवदासी झालेली ती मुलगी. अंधश्रद्धेपोटीच लुगडं नेसून तृतीयपंथी म्हणून फिरणार्‍या उपेंद्र लिमयेशी तिचं सूत जुळतं. 'जीव रंगला' या गाण्यात त्या दोघांची शारीरिक जवळीक घडताना दिसते. अजय-अतुलचं संगीत, दिग्दर्शक राजीव पाटलांनी वापरलेल्या जुन्या घराच्या माडीच्या पावसाळी चौकटी, आणि अर्थात उपेंद्र लिमये – या सगळ्यांची कामगिरी थोरच आहे. पण मुक्ता – उफ्फ्! त्याच्या पोलक्याची बटणं काढून त्याच्या रुंद छातीवर हात फिरवताना तिचं बिचकणं आणि अखेर मोहाला शरण जाणं नि तेव्हाची तिची मुद्रा... देवा, इतका अस्सल शृंगार पडद्यावर पाहिल्याची आठवण मला नाही. 

मुक्तावर इतकं प्रेम असल्यामुळे आणि तिच्यातल्या त्या भक्ती-बर्वे-धाग्याची धास्ती असल्यामुळे 'चारचौघी' बघायला जाताना मला किंचित ताण होता. इतक्या सुंदर, भावखाऊ भूमिकेत, इतक्या वर्षांनी रंगमंचावर येताना आपलं पाणी सिद्ध करून दाखवण्याच्या दडपणाखाली तिच्याकडून काही अधिक-उणं होऊ नये अशी ती धाकधूक. अतिप्रेमापोटी आलेली. पण बाई आल्या, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं! नवर्‍याच्या विश्वासघातानं आलेलं हबकलेपण, त्यातून आईपाशी उलटा कांगावा करणं, उद्ध्वस्त होणं, आईनं झापल्यावर भानावर येणं, हळूहळू स्वतःचा करारी सूर शोधत जाणं, कणखर होणं... दृष्ट लागण्याजोगं सगळं. त्यात ती तिच्या नवर्‍याशी फोनवर बोलते असा एक मोठा प्रसंग आहे. त्या प्रसंगातला तिचा संताप, नवर्‍याबरोबरच्या शृंगाराच्या आठवणीनं आलेली कासाविशी, दुसर्‍या बाईच्या कल्पनेनं आलेला घायाळपणा, मुलीच्या आवाजानिशी एकाएकी बेभान होऊन रडकुंडीला येणं.. मध्ये बोलणार्‍या आईवर तिरमिरून तिला गप्प करणं... त्या प्रसंगानंतर पहिल्या अंकाचा पडदा पडतो. तो पडदा पडला नसता, तर पुढचं नाटक बघणं जड जावं – असा तो परफॉर्मन्स. रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे... या सगळ्या लोकांची तितकीच जबरदस्त, सहज साथ – हा शब्द त्या तिघींना अन्यायकारक आहे, मला कल्पना आहे, पण त्यांच्याबद्दल लिहिण्याची ही जागा नाहीय – आणि नाटकातली भाषा-आशय... हेही तितकंच मोठं आहे, खरं आहे. पण त्यातली मुक्ता – एखाद्या कोंदणात अचूक शोभणार्‍या हिर्‍यावर एकच प्रकाशतिरीप पडल्यावर तो लखलखतो, तशी ती त्या प्रसंगात झळाळून उठते.

अलिबागजवळ एका कौटुंबिक ट्रिपला गेलो असताना तिथे मुक्ताही आली होती. तीन दिवस सतत दिसत राही ती आजूबाजूला. सुरूंच्या बनातल्या एका टेकाडावर, समुद्राकडे टक लावून, एकटीच निवांत बसलेली दिसायची. तिची तंद्री भंगावीशी वाटली नाही. अखेर आपल्याला इतक्या आवडणार्‍या एखाद्या कलावंताला "तू जाम भारी आहेस!" यापल्याड काय सांगणार, नि त्यावर तो काय म्हणणार, असा नेहमीचाच पेच. त्यापोटी बोलायला जाणं टाळलं. तिच्या सगळ्या भूमिकांमागे आता मला तिची समुद्राकडे बघणारी शांत मुद्रा एखाद्या बॅकड्रॉपसारखी आठवत राहते, हे मला त्याबद्दल मिळालेलं बक्षीस.

मराठी नट्या ०२

आपण दुसऱ्या कुणाला दमदाटी करताना वरच्या दाताखाली खालचा ओठ आवळतो आणि डोकं खाली झुकवतो झटक्यानं, तसं करणारा एक टारगट दादागिरी-भाव रसिकाच्या चेहऱ्यात लपलेला आहे, असा कायम भास होई मला. बघता बघता ती 'क्या बे?' असं म्हणून टगेगिरी करायला लागेल, असं वाटायला लावणारा. मी तिची जी-जी कामं पाहिली, त्यांतली बहुतांश या छटेच्या जवळची होती म्हणूनही असेल. पण ते तितकंच नव्हतं. तिच्या व्यक्तिमत्त्वातच ते काहीतरी होतं असावं.

तिचं 'उंच माझा झोका गं' हे नाटक माझ्याकडून हुकलं. मग एकदम 'प्रपंच'मधली अलकीच. त्या भूमिकेतली रसिका डोक्यात गच्च रुतून राहिली. एकत्र कुटुंबातली मुलगी, नाटकात रस असणारी, स्वतंत्र मतं असलेली, ती बेदरकारपणे मांडायला न कचरणारी, रूढार्थानं बाईपणाच्या झुली चढवायला नकार देणारी, ढगळ्या पुरुषी शर्टपॅंटीत वावरणारी. त्या भूमिकेत 'तसं' काहीही नव्हतं, पण मला कायम ते काम बघताना तेंडुलकरांच्या 'मित्रा'ची आठवण यायची मात्र. मित्रामधली बंडखोरी अलकाच्या भूमिकेत होती. 'सुरणाची भाSजी'चा सूर लावणारी, "आई, अगं एकवीस वर्षांचीय फक्त आपली लतिका. लग्न?" म्हणून कळवळणारी, मंग्यासोबत लग्नाविषयी बोलताना-न बोलताना तिच्या नेहमीच्या नुराला न साजेसा कोवळा गोंधळ घालणारी अलका मला कायम आधी आठवते. रसिकाच्या सगळ्या आठवणीतच अलकाची आठवण वेगळी न काढता येईलशी विरघळून गेली आहे, असं जाणवतं. 

त्याच सुमारास तिचं 'सुपरहिट नंबर वन' नाटक पाहिलं. त्यात ती आणि उपेंद्र दोघं अतिरेकी होते! तिच्या त्या रावडी कामानं तिची प्रतिमा ठसलीच माझ्या डोक्यात. 'व्हाइट लिली नाइट रायडर' पुष्कळ नंतरचं. त्यातलं तिचं काम निराळं होतं. पण तोवर मीही बंडखोरीच्या वयातून त्या भूमिकेच्या वयाच्या जरा जास्त जवळ गेले होते, म्हणूनही असेल. अतीव आवडलं ते लेखन आणि कामही. जोडीदार नको असं नाही, पण आर्थिक-सामाजिक तडजोडी करण्याची गरज संपल्यामुळे, इंटरनेट स्मार्टफोन्ससह बहुमितीय ओळखींशी झगडत असल्यामुळे... जोडीदार शोधताना निराळ्याच अडचणी पेलणारी आमची पिढी. त्याबद्दलचं ते नाटक आवडलं. आणि त्यातली रसिकाची आडमुठी-किंचित छुप्या प्रकारे हळवी लिलीही आवडली. इतकी आवडली, की रसिका गेल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं केलेलं ते काम बघायला मी परत गेले, पण कपाळाला आठ्या घालूनच. जणू दोष शोधायलाच. पण सोकुनं त्या भूमिकेला दिलेल्या छटा इतक्या वेगळ्या नि ताज्या होत्या की आवडलं ते काम. पण रसिकाशी निष्ठा इतकी, की 'हं, चांगलं केलंय.' असं ग्रजिंगलीच मान्य करता आलं.

'एक हसीना थी' आला नि रसिका हिंदीतच शिरली. त्या कामासाठी तिची निवड 'सुपरहिट नंबर वन'चा प्रयोग बघून झाली होती असं कळल्यावर मलाच उगाच जाम भारी वाटलेलं. कारण जेमतेम आठदहा प्रेक्षक असलेल्या चार-पाच प्रयोगांतला एक मी पाहिलेला. तिला हिंदीत बिनधास्तपणे वावरताना बघून जाम बरं वाटायचं, 'अर्थात! ती नाही तर कोण!' असं वाटायचं. 'भूलभुलैया'तली केरसुणीनं हूल देऊन अक्षय कुमारला हाकलायची ॲडिशन तिनं घेतलेली असणार आणि सेटवर लोक हसून वेडे झाले असणार, असं मला पाहताक्षणी वाटलं होतं. अजूनही वाटतं. 

पण हिंदीतली रसिका नंतरच्या काळातली. त्याआधी 'प्रभात' नामक एका मराठी वाहिनीवर तीच बारा-पंधरा नाटकं आलटून पालटून लागायची काही वर्षं. त्यात रसिका असलेलं 'गंमत-जंमत' हे नाटक असायचं. त्यात किती प्रकारच्या भूमिका केल्या होत्या तिनं! त्या टीव्हीवर पडीक असल्यामुळे मनमुराद बघता यायच्या. त्यातली तिची 'राड्डो'चं घड्याळ मिरवणारी नवश्रीमंत महिला आणि दाताच्या फणी पुढे असलेली बाई विशेष आठवते. त्यात तिची रेंज दिसे. चकित वाटायचं या जाडजूड देहाच्या, आडव्या बांध्याच्या मुलीचा आत्मविश्वास आणि शरीरावरची पकड बघताना. 'खबरदार'मध्ये ती संजय नार्वेकरची आई होती. कष्टकरी नऊवारी पातळ आणि कजागपणा यांचं मिश्रण रसिकाला कायच्या काय शोभून दिसलं होतं. 

नाटक चालू असताना फोनवर बोलणाऱ्या नि बोलता बोलता चक्क स्टेजवरच्या रसिकाला हातानं 'एक मिनिट हं, झालंच.' अशी खूण करणाऱ्या एका प्रेक्षकाची तिनं हतबल संतापानं केलेली, अवधूत गुप्तेच्या कार्यक्रमातली नक्कल थोर होती. या विषयावर ती आणि तिचा नवरा एक स्वतंत्र प्रयोग सादर करू शकतील कदाचित, असं वाटून गेलं होतं.

एकदा आशियाई चित्रपट महोत्सवाच्या दिवसात 'प्लाझा'बाहेर रेंगाळताना मला रसिका नि मुक्ता दोघी एकदम सुटकेसा खरेदी करताना दिसल्या. मला इ त क्या बेहद्द आवडणाऱ्या दोन नट्या एकत्र समोर बघून काही सुचलंच नाही बोलायला. तसंही जाऊन सांगणार काय, 'तुम्ही किती भारी आहात!' असं?! मग त्या दोघी प्लॅस्टिकचं हसू हसणार. नकोच ते. असं वाटून मी उलट फिरून तिथून निघून गेले. 

रसिका गेल्याचं कळल्यावर बाकी कशापेक्षाही माझी मेजर चिडचिड झाली होती. That was not fair. तिला किती काम करायचं होतं अजून. याला काय अर्थ होता? तिला कुणीतरी उलटी दमदाटी करून थांबवून घ्यायला पाहिजे होतं. पण तिला दम देणारं होतं कोण?

मराठी नट्या ०१

नटांच्या अभिनयाबद्दल भरभरून लिहितात, तसं नट्यांच्या बाबतीत होत नाही. नटी म्हटलं की मधुबाला-टाईपचं सौंदर्य आठवण्याची प्रथा आहे. पण मराठीत कसली एकाचढ एक नट्यांची परंपरा आहे! नि रूढ सौंदर्यबिंदर्य राहिलं बाजूला – बघणार्या माणसावर फुंकर टाकून मंतरून टाकणारा अभिनय नि वावर नि व्यक्तिमत्त्व असलेल्या नट्या. रेंज आणि इंटेन्सिटी आणि सूक्ष्मातिसूक्ष्म भाव दाखवण्याची क्षमता वागवणार्या. शबाना आझमी ‘Why actress? I am an actor.’ म्हणते तसं त्यांना नट्या न म्हणता कलाकार म्हणावं नि लिंगभेदासह येणारी कमनीय सौंदर्याची अपेक्षा साफ पुसून टाकावी, असा मोह होतो.
~
लीना भागवत त्यांपैकी एक. माझी कायमची तक्रार आहे, की आपण लीना भागवत या बाईच्या अभिनयकौशल्याचं पुरेसं अप्रूप बाळगलेलं नाही, कौतुक केलेलं नाही. मी कमी ठिकाणी पाहिलं आहे तिला. सगळी मिळून तीन नाटकं. त्यांतलं एक तर रेकॉर्डेड. टीव्हीवरच्या दोन-तीन मालिका. पण माझ्यावर त्या बाईनं जादू केली आहे.


रूढ अर्थानं सुंदरबिंदर तर ती नाहीच. काळीसावळी बाई. खळी पडते तिला. पण त्या खळीकडे लक्ष्य जावं, अशी कामं तिनं केलेली पाहिली नाहीत. ती कायम सर्वसामान्य मुलगी वा बाई असते. ‘अधांतर’मध्ये तिनं मंजूची भूमिका केली आहे. कनिष्ठ मध्यमवर्गीय चाळ. निवर्तलेल्या गिरणी कामगाराचं घर. मंजूचा नवराही गिरणीकामगार. पण ती आणि नवरा दोघेही आईकडे राहत असलेले. फटकळ, स्ट्रीटस्मार्ट मंजूला आईनं बिजवराकडे उजवून दिल्याचा सल आहे. पण आपलं आपण बघावं लागतं ही स्वार्थी जाणीवही. गाऊनमधला वावर, बोलता-बोलता फणकार्
यानं केसांचा अंबाडा बांधून टाकायची लकब, कोकणी ब्राह्मणेतर घर मुंबईच्या चाळीत वसलं की तोंडी येणारी बोली... लीना भागवतनं केलेल्या मंजूखेरीज दुसर्या कुणालाही डोळ्यासमोर आणणं शक्य नाही. अर्थात, हे ‘अधांतर’च्या सगळ्याच पात्रयोजनेबद्दल तितकंच खरं आहे, पण त्यानं भागवतबाईंचं पुण्य कमी होऊ नये. ‘नाय’चा तिचा उच्चार आणि जहाल नजर या दोन्ही गोष्टींना तुलना नाही. असंच तिचं काम ‘पाऊस येता येता...’ या मराठी मालिकेत बघितलं होतं. माझ्या आठवणीनुसार दैनंदिन साबणवड्या सुरू होण्याच्या जस्ट आधीच्या दिवसांतली ती मालिका होती. त्यातही ती एका कनिष्ठमध्यमवर्गीय विवाहितेचं काम करत असे. आपल्या बहुधा फेमिनिस्ट नणंदेला उद्देशून तिनं उच्चारलेलं “राह्यलं. फडकवा – स्त्रीस्वातंत्र्याचे झें-डे!” हे वाक्य मला अजुनी आठवतं. त्यातली तुच्छता, जाणतेपणा, राग... सगळंच एकमेवाद्वितीय होतं. तशीच तिनं पालेकरांच्या ‘कैरी’मध्ये केलेली मोलकरणीची भूमिका. किती कमी संवाद आहेत तिला! पण तिचा नुसता वावर – चवचालपणा, नागडा स्वार्थ, देहाचा पुरेपूर वापर करणारी मानसिकता, नायिकेच्या नवर्याला पदराला गुंडाळून घेतल्याचा ताठा... या सगळ्याचा गाळीव अर्क तिच्या वावरात आहे. लीना भागवत पडद्यावर दिसत असली की ती तीन-पदरी मंगळसूत्राची फॅशन आणणार्या जान्हवी नामक नायिकेची मालिकाही मी चुपचाप थांबून बघायचे. नवर्याच्या आत्यंतिक प्रेमात असलेली, पण सासूच्या धाकामुळे त्याला चोरून भेटत असणारी, भाबडी, धांदरट, प्रेमळ बाई अशी तिची भूमिका होती. लीना भागवत त्या फडतूस मालिकेतले काही क्षण बहारदार करून सोडायची. ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकेतलं तिचं काम याच धाटणीचं होतं. मध्यमवयीन, संसारी, प्रेमळ गृहिणीचं. निव्वळ लीना भागवत – मुक्ता बर्वे एकत्र दिसल्यावर काय होईल, या उत्सुकतेपोटी ती मालिका बघितली जायची. तेंडुलकरांच्या ‘अशी पाखरे येती’चा नव्या संचातला प्रयोग मी पाहिला होता. त्यात ती सरू होती. नि काय होती! अहाहा...

ती होती म्हणून तिचं नि मंगेश कदमचं काम असलेलं एक नाटक बघायला गेले. त्यात हे थो हो र ह जोडपं मंचावर काहीतरी बोलत होतं. मग शशांक केतकर नावाची नुकतीच मराठी मालिकेतून लोकप्रिय झालेली एक पुटकुळी येऊन स्टेजवर फुटली. लोकांनी प्रेक्षागारातून ‘श्री! श्री!’ – हे त्याचं मालिकेतलं नाव – अर्थात – अश्या चकित-भारावलेल्या हाका मारल्या नि आपण अशा प्रेक्षकांत असायची लाज वाटून मी उठून आले. असो.

अजूनही ‘भाडिप’ची डोक्यात जाणारी कांदेपोहे-स्फुटमालिका बघितली जाते, त्याला कारण ही बाई. कर्तृत्वाचा काही संबंध नसता निव्वळ राहत्या शहरामुळे आलेला आत्मविश्वास, आगाऊपणा, भोचकपणा, मानभावीपणा... लीना नाही दाखवणार तर कोण?!

‘दिल के करीब’मध्ये सुलेखा तळवलकरनं तिची एक मुलाखत घेतली आहे, त्यात ती मंगेश कदम आणि तिच्या लग्नाविषयी, तिच्या कामाविषयी, कामाविषयीच्या तिच्या दृष्टीकोनाविषयी बोलते. ती मुलाखत बघून अलीकडच्या काळात लीना भागवत बघण्याची माझी तहान काही अंशी शमली. पण तिला तिच्या स्वभावामुळे तिच्या योग्यतेचं काम मिळत नसणार, असंही वाटून गेलं. तिनं आजवर जे केलंय त्याहून वेगळं काही न केलं, तर तिच्यावर आपल्याला जे येतं, तेच करत राहिल्याचा आरोप होऊ शकेल. तिचा वकूब पुष्कळ आहे. तिनं नि मराठी नाटक-सिनेमावाल्यांनीही ओळखावा तो.

मेहंदी से जला के उंगलीयाँ...

आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला लागला तर, म्हणून सेफ्टीपिना, टाचणी, एखादं फडकं, सेलोटेप असा सगळा सरंजाम तयार ठेवायचा. तेव्हा आयते कोनही तसे अपूर्वाईचेच होते पण. बाबांची चित्रकला चांगली असल्यामुळे त्यांच्याकडून आईनं मेंदी काढवून घेतल्याचीही मला आठवण आहे. पण त्यात काही रोमॅंटिक वाटायची ऐवजी आईचा चिकित्सकपणा, भेंडी वाटून घातल्यामुळे अतिरिक्त तार आलेली मेंदी, हिरकुटाची हजारदा मोडणारी काडी आणि त्यामुळे एकंदर कावलेले बाबा, इतकीच अंधुक आठवण. पुढे बरेच दिवस त्या प्रकरणाचा शेष रोमान्स पुरला असावा. कारण मग अनेक वर्षं काडीनं मेंद्याबिंद्या काढल्याचं मला आठवत नाही. एकदम कोनच आठवतात. पण ते ठाण्यातल्या दुकानांतून सर्रास नि खातरीचे मिळायला लागण्यापूर्वी ट्रेनने येणार्या कुणालातरी कुर्ल्याच्या स्टेशनबाहेरच्या मार्केटातून आणायला सांगत असू. मेंदी आणि मुसलमान धर्म यांची अस्फुट का होईना – जोडी जुळल्याची ती एकमात्र आठवण. बाकी मेंदी कायमच आसमंतात होती. नि बायकी नटमोगरेपणा वगळला , तर तिच्याशी इतर कसले लागेबांधे नव्हते. धार्मिक तर नव्हतेच नव्हते. एनिवे.


तर कोन. काही हौशी नि कुटीरोद्योगी लोक मेंदीचे कोन घरी करत असत. मेंदीची भुकटी पातळ कापडातून जमेल तितक्या वेळा गाळून घेणे, मग ती एकही गुठळी राहू न देता उकळून गार केलेल्या चहाच्या पाण्यात भिजवून ठेवणे, भिजवताना त्यात लिंबाचा रस – तोही गाळून! – घालणे – मग ती पेस्ट दुधाच्या पिशवीच्या कोनात भरून सेलोटेपनं तो बंद करणे... असा सगळा खटाटोप असायचा. मेंदीच्या क्लासला जाऊन तोही मी एखाद-दुसर्या वेळा यशस्वीपणे केला आहे. पण हळूहळू बाजारानं ती गरज संपवली. तरी मेंदी हा एक उपक्रम असायचा. दुसर्या दिवशी रविवार हवा. कोन तर हवेतच. कापूस. निलगिरीच्या नाहीतर लवंगेच्या तेलाची एखादी चिमुकली कुपी. लिंबाचा रस आणि साखर यांचं संपृक्त द्रावण. शिवाय घरात लवंगा आहेत ना हे बघून ठेवायचं. मेंदीचं एखादं पुस्तक. तेव्हा ‘लोकप्रभा’ आणि ‘साप्ताहिक सकाळ’ वर्षातून एकेकदा मेंदी विशेषांकही काढायचे. ते जपून ठेवलेले अंक. मग कुठलं डिझाईन कुणाला ते ठरवायचं. शेजारच्या काकी कलाकार. त्यांना ते दाखवून त्यांच्याकडून अप्रूव करून घ्यायचं. नि मग रात्री काकी पेंगायला लागेस्तो मेंदी प्रकरण सुरू. हाताला निलगिरीचं तेल लावून घ्यायचं. काढताना हात हलवायचा नाही, मेंदी काढल्यावर वाळेस्तो वाकवायचाही नाही. मेंदी किंचित सुकू लागली की मग अलगद कापसानं लिंबूसाखरेचा पाक लावायचा तिला, की मग ती हाताला घट्ट चिकटून बसते. आधीच हातावर रेखाटलेली ओली मेंदी काहीच्या काही सुंदर दिसते. त्यात तो साखरेचा द्राव तिच्यावर बसला की तिला चकाकी चढायची. हाताकडे बघत राहावं वाटायचं. कोयर्या, वेलबुट्ट्या, ग्रेसफुली वळलेले ग आणि ह ल्यालेल्या वेली, पाना-फुलांचे नाना प्रकार, हंस, मोर, चक्रं, शंख, हत्ती... यांचीच कॉम्बिनेशन्स असलेल्या नक्ष्या. चोचीत चोच घातलेले हंस बघताना मला अगदी टिपिकल बायलट वाटायचं, ते बहुधा या सगळ्या चित्रांमधला स्टिरिओटिपिकल बायकी नाजूकपणा जाणवल्यामुळेच असावं. पण हाताला वळणच इतकं पडलं, की आता कागदावर डूडल काढतानाही असलंच काहीतरी हातून उमटतं. पुढे कधीतरी एकदा कोयरी हे स्त्रीच्या गर्भाशयाचं प्रतीक आहे हे ऐकल्यावर मी अवाक झाले होते. आश्चर्य, चिडचिड, आणि मग पुन्हा वळून तो डौलदार आकार हट्टानं रिक्लेम करण्यासाठी झगडणं. एनिवे! नि हो, एका हातावर दुल्हा नि एका हातावर घुंगटातली दुल्हन असंही एक असायचं. दोन्ही हात एकमेकांशी जोडून त्याची ओंजळ केली, की ते एकमेकांकडे बघताना दिसणारे, असा लग्नाच्या अल्बममधला एक फोटोही ठरलेला असायचा. हल्ली काय असतं काय कळायला मार्ग नाही. पण हे दुल्हा-दुल्हन डिझाईन मात्र स्ट्रिक्टली फ-ह-क्त-ह नवर्यामुलीसाठी. तिच्या मेंदीत नवर्याचं नाव लिहायचं नि मग नवरा सुहागरातीला ते शोधेल असाही एक भाबडा संकेत मनात अनेक वर्षं होता. नवर्याचं वा प्रियकराचं प्रेम असेल तर मेंदी रंगते, हा विड्याच्या बाबतीतला कॅरीड फॉर्वर्ड संकेत मात्र आमच्या विश्वात शिरला नव्हता. एखादीची मेंदी अती रंगली (“अय्या! हिची काळी झाली बघ!”) तर ‘काय हीट आहे गं तुझ्या अंगात.’ इतपतच आमची धाव. ती मेंदी रंगावी म्हणून कोण कर्मकांडं. मेंदी वाळून पडून जायच्या आत साखरेचं पाणी तर झालंच, पण आधी निलगिरीही त्याचसाठी. झोपताना हात अलगद उशाकडे वर ठेवून झोपायचं. तोही पालथा नाही! उठल्यावर सगळीभर मेंदीचे कणकण पडलेले असायचे नि बाबा वैतागायचे. ती मेंदी काढून टाकतानाही सुरीबिरीनं खरवडून काढायची. पाणी लावायचं नाही. चुन्याच्या पेस्टचा एक थर द्यायचा. मग लवंगा तव्यात तापवून त्यावर हात शेकवायचे. जमेल तेवढा वेळ हात न धुता वावरायचं. कुणाची किती रंगली, ते तपासून बघायचं.

माझ्या आजूबाजूला कुठेच मुलगे नव्हते. मावसभाऊ होते, पण ते मेंदीच्या खटाटोपात अजिबात नसायचे. त्यामुळे एखाद्या मुलाला हे सगळं बघून मेंदीचं अप्रूप वाटतं का, मेंदी काढून घ्यावीशी वाटते का, नि मग बाकीचे लोक त्यांच्याशी कसे वागतात, ते मला बघायला मिळालं नाही कधीच. पुढे एकदा एका गे मित्रानं कौतुकानं मनगटावर मेंदीनं काढलेली काकणं दाखवली होती, तेव्हा त्याच्या गे असण्याशी हे जोडलं जाईल का हा प्रश्न मला पडल्याचा आठवतो. पण हळूहळू आपण लिंगभावाबाबत निदान शहरांतून तरी तसे बर्यापैकी खुले होत गेलो आणि मेंदी मागे पडत गेली. आपण खुले झालो हे ठीकच. पण मेंदी मागे पडली हे जरा खटकतं. मला तिच्याबद्दल कधी कसली अढी नव्हती. तिला स्त्रीत्वाचे लागेबांधे लगडलेले असूनही आणि मला स्त्रीवादाचे वारे लागल्यानंतरही मला मेंदी मनापासून आवडायची. लग्नाची मेंदी काढून पहिली कमाई करण्यापासून ते सख्ख्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधल्या दिवशी मेंदी काढताना दोघींनीही उद्यापासून बदलणार असलेल्या परिस्थितीचा ताण वाटून, कंटाळून ‘मरो मेंदी’ असं म्हणत गप्पाच मारत बसण्यापर्यंत अनेक प्रकारे मेंदी आयुष्यात होती. आहे.

कोरड्या, ओल्या, नंतर रंगलेल्या मेंदीचा – असे तीन स्वतंत्रपणे ओळखू येणारे धुंदावणारे गंध. हातांवरून वाहत असल्यासारखे दिसणारे ते डौलदार आकार. रंगण्या-न रंगण्याबद्दलची उत्कंठा. सगळंच बेहद्द आवडायचं. आवडतं. ‘बेहनों ने रौशनी कर ली, मेहंदी से जला के उंगलीयाँ’ ही 'पिंजर'मधली ओळ ऐकल्यावर हटकून रंगलेल्या मेंदीचा आतून उजळल्यासारखा दिसणारा केशरी रंग आठवायचा नि तो रंग पाहिला की कधीही तीच ओळ मनात उमटायची. ‘गीली मेहंदी की खुशबू’ लिहिणारा गुलजार मित्रासारखा वाटायचा, त्याचं तेही एक कारण असणारच, इतकी मला मेंदी प्रिय.

आत्ता काही श्रावण नाही. पण श्रावणात लिहायला बसलं तर हे अजूनच क्लिशेड वाटणार आहेच. म्हणून आत्ताच मनात आल्याक्षणी let's indulge म्हणत निखळ नॉस्टाल्जियाला शरण जाणं.

बुजरी गाणी १०

कसल्यातरी आघातानं एकाएकी मोठं होऊन बसावं लागलेल्या लोकांचं वाढलेलं वय निराळं कळतं. त्या वाढलेल्या वयात राठपणा असतो, पण त्यासोबत येणारी सुंदर नैसर्गिक प्रगल्भता नसते. नुसताच जगाला फसवू शकणारा मुखवटा असतो. काही कारणानं त्याला तडा गेला, की वाढता वाढता थबकून राहिलेलं कोवळं मूल भांबावून बाहेर डोकावू लागतं. नजरेत वयाला न जुमानणारी आर्तता येते. ती या गाण्यातल्या नायकाच्या नजरेत आहे.

‘अग्निपथ’च्या नायकाची गोष्ट ही हिंदी सिनेमाच्या नायकाची स्टॅंडर्ड गोष्ट – बापाच्या खुनाचा सूड घेऊ पाहणाऱ्या मुलाची. सगळ्यांना चिरपरिचित असलेली. पण गाण्यात सुडाचा प्रवासबिवास नाही. निखळ मूलपण आहे.

सगळी घासून गुळगुळीत झालेली दृश्यं दिसतात गाण्यात. लहानपणीच्या आनंदाशी लागेबांधे असलेली. फुगे हातात घेऊन उडवणं, समुद्रकिनारी धावत सुटणं, साबणाचे फुगे उडवणं, आकाशपाळण्यात बसणं, फॅमिली फोटो काढून घेणं... सगळी मूलपणाशी निगडित असलेली ठरीव-साचेबद्ध सुखं. पण त्यात किती आर्तता भरली जाते सोनू निगमच्या सुरांनी आणि हृतिकच्या नजरेनी! त्याची धाकटी बहीण त्याला इतक्या वर्षांनी प्रथमच भेटलीय. तिला मिठीत घेतल्यापासून ते पार गाण्याच्या शेवटापर्यंत हृतिकच्या नजरेतला अविश्वास काही केल्या लपत नाही. जणू या साध्या-साध्या सुखांवर त्याचा हक्क नाहीचेय. कुणीतरी येऊन त्याचं स्वप्न मोडून टाकेल नि त्याला जाग येईल, म्हणून सावधपणी सुखाची चव चाखावी, असा तो गाणंभर वावरताना दिसतो.

गाण्यात त्याची प्रेयसी असलेली प्रियांका चोप्राही आहे. पण हृतिक आणि ती यांच्यातला रोमान्स कुठेच नाही. ती जणू त्या बहीणभावांना जवळ आणू पाहणारी मैत्रीण आहे निव्वळ. नायकाची बहीण, नायक, आणि नायिका या तिघांचा ग्रुप फोटो काढताना एका क्षणी नायकाचा अवघडलेपणा फुटून जातो नि ते हसून एकमेकांकडे प्रेमभरानं बघतात, त्या क्षणी एकाएकी ते तिघंही कुटुंब होऊन जातात.

तो त्याच्या लहानग्या बहिणीचा लहानपण हरपून गेलेला भाऊ होतो. तिच्यासोबत अडखळत साबणाचे फुगे काढतो, ते न जमून स्वतःलाच हसतो. तिला पाळण्यात बसवल्यावर, उंच गेलेल्या तिच्याकडे कौतुकभरल्या नजरेनं पाहताना, तो तिचा बापही होतो; तेव्हा ‘ये लम्हां कहाँ था मेरा....’ असं विचारणारा सोनू निगमपण आपल्याला उंच उंच घेऊन जातो...

सुरात आणि दृश्यात इतकी आर्त कोवळीक भरणारं हे गाणं फार फार आवडतं.

~


अभी मुझ में कहीं बाकी थोडी सी है जिंदगी
जगी धडकन नई, जाना जिंदा हूँ मैं तो अभी
कुछ ऐसी लगन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा
अब है सामने, इसे छू लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा
खुशियाँ चूम लूँ, या रो लूँ जरा, मर जाऊँ या जी लूँ जरा

धूप में जलते हुए तन को, छाया पेड की मिल गई
रूठे बच्चे की हंसी जैसे, फुसलाने से फिर खिल गई
कुछ ऐसा ही अब महसूस दिल को हो रहा है
बरसों पुराने जख्म पे मरहम लगा सा है
कुछ ऐसा रहम, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

डोर से टूटी पतंग जैसी, थी ये जिंदगानी मेरी
आज हो कल हो मेरा ना हो, हर दिन थी कहानी मेरी
इक बंधन नया पीछे से अब मुझको बुलाये
आने वाले कल की क्यों फिक्र मुझको सता जाये
एक ऐसी चुभन, इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा

~
नुक्ते आणि चांदबिंदी टंकायकरता कळपाट बदलण्याचा कंटाळा केल्यामुळे आणि हिंदी प्रमाणलेखनाचं अज्ञान असल्यामुळे चूक-भूल-देणे-घेणे.


Monday 4 September 2023

चाळीस वर्षं ओलांडून आलेली मैत्रीण


एकेरीत उल्लेख करायला पद्मजा फाटक मला समवयस्क नव्हे. सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर वगैरे लोकांसारखी आपोआप एकेरीतली जवळीक प्राप्त होण्याइतकी सुप्रसिद्ध आणि थोर कलावतीही नव्हे. पण तरीही तिच्याशी झालेल्या पहिल्याच पुस्तकभेटीनंतर तिच्याविषयी ‘आदरणीय लेखिका पद्मजा फाटक’ या जातीचं काही न वाटता मैत्रिणीसारखी जवळीक वाटली आणि वाटतच राहिली, त्यामागची कारणं किंचित गुंतागुंतीची आहेत.
ललित लेखिका म्हणून आज मराठीत ती फारशी प्रसिद्ध उरलेली नाही. ‘बाराला दहा कमी’ आणि ‘हसरी किडणी’ यांसारखी तिची पुस्तकं बाजारात उपलब्ध आहेत. पण ‘गर्भश्रीमंतीचं झाड’ आणि ‘सोनेलूमियेर’ हे सुरेख ललितलेखसंग्रह सहजासहजी मिळत नाहीत. मग तिच्या सुरुवातीच्या काळातले ‘राही’ आणि ‘दिवेलागणी’ हे कथासंग्रह कुठून मिळणार? मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कृपेनं आणि नंतर एका मित्राच्या शोधक नजरेमुळे मला ‘दिवेलागणी’ हा कथासंग्रह मिळाला.
या कथासंग्रहाविषयी सांगण्यापूर्वी पद्मजाची थोडी पार्श्वभूमी सांगणं भाग आहे. आज ती हयात असती, तर ती ऐंशी वर्षांची असती. साधारण तिच्या विशीबाविशीपासून ती लिहीत होती असावी. आई-वडील दोघेही सुशिक्षित, नोकरदार. लहानपणापासून कायम शहरात झालेलं वास्तव्य. उच्चशिक्षण, लेखनप्रकल्प, सांस्कृतिक वर्तुळातला वावर, मुलाबाळांसकट सुफळसंपूर्ण संसार, पुरस्कार आणि वाचकप्रियता अशा दोन्ही आघाड्यांवर लेखनात मिळालेलं यश... अशा सगळ्या प्रकारे ती चमकदार, पण चाकोरीतली व्यक्ती होती. पण लेखिका उर्फ स्त्रीलेखक म्हटल्यावर बंडखोरी वा बोल्डनेस वा स्त्रीस्वातंत्र्याचे झेंडे वाहण्याची जबाबदारी वा शोषित अबलांचा कळवळा अशा ज्या गोष्टी बघणार्याच्या नजरेत आपोआप उमटतात, त्यांपैकी कुठल्याही गोष्टींच्या अभिनिवेशाची ओझी तिच्यापाशी मुळातच नव्हती. पण म्हणून ती झापडबंद होती असं मात्र नव्हे. स्त्रीवादाचं चोख भान तिच्यापाशी होतं. हे माझ्या मते तिचं सगळ्यांत मोठं वैशिष्ट्य. विवेक, वैज्ञानिकता, तर्कशुद्धता, सर्वार्थानं कॉस्मोपॉलिटन नजर ही सगळी आधुनिक मूल्यं... त्याखेरीज आलेली.
या कथासंग्रहात तिची ही सगळी वैशिष्ट्यं दिसतातच, शिवाय त्या-त्या मूल्यांना अनेकदा लगडून येणारा तर्ककठोरपणा न येता मानवी भावनांविषयी असलेलं कुतूहल आणि आस्था दिसत राहतात.
अंतर्बाह्य शहरीपणा हा तिचा ठळकपणे जाणवणारा गुण. ‘बेस्ट’च्या बसमधल्या सहप्रवासिनीच्या इतिहास-भूगोलाविषयी आडाखे बांधणारी निवेदिका ‘मूर्त’ या कथेमध्ये आहे. त्यातून तिच्या शहरी अवकाशाची भौतिक खूण पटते. ‘सर्किट हाऊस’ या कथेत अस्तित्ववादी प्रश्नांमध्ये गुरफटलेला लेखक-निवेदक ऑटो-पायलट मोडवरून सराईतपणे मागे पडणार्या उपनगरी स्टेशनांची नोंद घेताना दिसतो. ‘म्हातार्या’ या कथेतली तरुण नायिका आपल्या म्हातार्या आईच्या काश्मीर सहलीची तयारी करून देणारी. आपल्याला पाठमोरं बघणार्या आपल्या आईला नि तिच्या मैत्रिणीला आपल्या ‘स्मार्ट’ दिसण्याची असोशी असेल हे उमजून दमले-भागलेपण विसरते आणि उंच टाचांमधली आपली आकृती बघता बघता ताठ करून आत्मविश्वासानं पावलं टाकत जाते. अशा कितीतरी शहरी – आणि त्यातही मुंबईसारख्या आधुनिक शहराच्या खाणाखुणा या कथांमध्ये विखुरलेल्या आहेत. पण पद्मजाचा शहरीपणा या भौतिक आणि भौगोलिक खुणांपुरता मर्यादित नाही. तिचं खरंखुरं कॉस्मोपॉलिटन शहरीपण तिच्या नायक-नायिकांच्या मूल्यव्यवस्थेपर्यंत झिरपलेलं दिसतं. ‘हायड्रिला’ या कथेत कुठल्याच अस्मितांची आणि परंपरांची मुळं नसलेला विद्याधर हा नायक आहे. कुटुंबव्यवस्था, जातीचं वर्तुळ, भाषिक अस्मिता, प्रादेशिक लागेबांधे... त्याला स्पर्शत नाहीत. त्याला मानवजातीशी जोडणारा धागा आहे, तो माणसाच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संतत ज्ञानतृष्णेचा.
‘पाहुणा’ या कथेची नायिका मध्यमवयीन पुरंध्री आहे. ध्यानीमनी नसताना पदरात आलेलं अवेळचं गरोदरपण खुडून टाकण्याचा तर्कशुद्ध, विचारी निर्णय ती घेते खरी. तो शांतपणानं पार पाडते. पण सगळं धडपणी झाल्यानंतरही, कुठलंही दृश्य वैद्यकीय कारण नसताना शरीराला आलेलं घायाळपण आणि मनाची कासाविशी हटता हटत नाही म्हटल्यावर अंतर्मुख होत जाते. स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरचा हक्क आणि पूर्ण निर्मितिक्षम शरीरापासून काहीतरी हिरावून घेतलं जाताना होणारी हिंसा यांच्यातलं द्वंद्व निरखून पाहते. आधुनिक दृष्टी असलेल्या व्यक्तीमधली ही तरल संवेदनशीलता हे या सगळ्याच कथांचं वैशिष्ट्य आहे. ‘अनअव्हॉइडेबल एक्स्पेंडिचर’ या कथेतली नायिका याच संवेदनशीलतेपोटी स्वतःला आरोपी करून प्रश्न विचारते आणि सरतेशेवटी आपणही जगासारखे ‘सोयीस्कररीत्या’ संवेदनशील, अशा, औषधाच्या कडू गोळीसारख्या गिळाव्या लागणार्या, निष्कर्षावर येते. तशीच ‘अनुभव’ आणि ‘दिवेलागणी’ या एकाच जातकुळीच्या कथांची नायिकाही. म्हटलं, तर त्यांतलं ‘विवाहित स्त्रीचा मित्र’ हे सूत्र काहीसं सरधोपट आहे. पण त्याकडे बघण्याचा नजरिया मात्र खास पद्मजाचा. ‘मैत्रीची एक स्वतंत्र कमिटमेंट’ असते आणि ‘संपून गेलेल्या मैत्रीचीही डिग्निटी’ सांभाळायची असते असं मानणारी त्यांतली नायिका पारंपरिक कौंटुबिक चौकटीविरुद्ध बंड करत नाही, पण मैत्र या अतिशय आधुनिक नात्याचं मोठेपण मात्र ती मनोमन मानणारी आहे.
‘विदुर’ या कथेतल्या नायिकेला एका उतरत्या दुपारी चक्क भूत दिसावं, तशा एका वृद्ध आणि मृत परिचितांचं दृश्यरूप समोर साकारताना दिसतं. ‘आपण हे नक्की काय अनुभवतो आहोत?’ असा प्रश्न मनात उमटत असताना, पूर्ण जागेपणी आलेला हा अनुभव. पण नायिकेची त्याकडे पाहणारी दृष्टी सजगपणे विज्ञाननिष्ठ आहे. पण तसं असूनही ती तो अनुभव नाकारत नाही. चाकोरीबाहेरचं आयुष्य जगण्याची ओढ, त्याकरता घ्याव्या लागणार्या निर्णयांमधून अपरिहार्यपणे दुखावले जाणारे आप्त, वार्धक्यामधली असहायता, एकंदर मानवी आयुष्यातलं स्वयंनिर्णयाचं कःपदार्थ स्थान... अशा, मोठा आवाका असलेल्या प्रश्नांकडे वळण्याकरता एका अद्भुत अनाकलनीय अनुभवाचा माग वापरावा, तशी ती कथा.
दात विचकत आणि बाहू फुलवून दाखवत, एकमेकींसमोर गोल-गोल फिरून एकमेकींच्या शक्तिसामर्थ्याचा अंदाज घेत, धीम्या पण निश्चित गतीनं, बाहेरच्या वर्तुळांतून अधिकाधिक आतल्या स्नेहवर्तुळांमध्ये शिरत जाणार्या दोन टोकदार स्त्रियांविषयीची कथा म्हणजे ‘माझ्या मुलीचा गॉडफादर’. हिंदी सिनेमानं भावनातिरेकी केलेल्या मैत्री नावाच्या एका नातेसंबंधात किती प्रकारची सूक्ष्म राजकारणं, डावपेच, खेळ्या-प्रतिखेळ्या असतात त्याचं भान ही कथा आणवून देते. मात्र तिचा शेवट कडवट नाही. त्यात मैत्री या नात्याविषयीचा उमदा आशावाद आहे.
‘स्पर्शाची’ ही कथा पूर्णतः वेगळ्या वाटेवरची. कुणी नेटके शब्द साठवावेत, कुणी सुरांचा छंद करावा, तशी निरनिराळे स्पर्श भोगून पाहणारी, साठवून ठेवणारी, त्यांद्वारे संवाद साधू पाहणारी एक मनस्वी स्त्री आणि तिच्या मैत्रीत पडलेली नायिका. या कथेच्या विषयात आणि कथानकात वेधक निराळेपण आहेच. पण त्याहूनही मला अतिशय आवडते, ती लेखिकेनं रेखाटलेल्या नायिकेची स्वतःच्या संकुचितपणाकडे हसत हसत लक्ष वेधणारी दृष्टी. मैत्रिणीच्या जगावेगळ्या छंदावर आक्रमकपणे हल्लाबोल करताना नायिकेचा आवाज ‘चिरकतो’ आणि अखेर ती ‘धांदरटासारखी’ माघार घेत मैत्रिणीच्या बोलण्याचा खुल्या मनानं विचार करू बघते. तिला आपल्या चौकटी मोडायच्या नाही आहेत, पण त्याच वेळी त्याबाहेरच्या जगाविषयी तुच्छता नाही, उत्सुकता आहे. हे मिश्रण सुरेख तर होतंच, पण त्याहूनही अधिक महत्त्वाचं म्हणजे माझ्या पिंडाला आणि जडणघडणीला जवळचं वाटणारं होतं.
बहुतांश स्त्रीवादी लेखिकांना त्यांच्या आविष्कारासाठी कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर शहरी अवकाश उपलब्ध झाला, हे सत्य आहे. पण हा अवकाश पद्मजाच्या कथांचा – खरं तर सगळ्याच लेखनाचा – आतलेपणानं हिस्सा झाल्याचं दिसतं. तिच्या अवघ्या लिहिण्यातून त्याच्या खाणाखुणा सतत दिसत राहतात. तिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीतून, सुशिक्षित-कमावती-प्रॅक्टिकल आई आणि नास्तिक-नि-प्रेमळ वडील लाभण्यातून, चौकोनी कुटुंब मिळण्यातून, शहरातला जन्म नि वास्तव्य असण्यातून, चिकित्सक नि विवेकी संवेदनशीलतेतून, अगदी उच्चवर्णीय उच्च-मध्यमवर्गीयपणातूनही - तिच्या लिहिण्याला जो विशिष्ट आकार आला, तो मधली चाळीस वर्षं ओलांडून माझ्यापर्यंत थेट येऊन पोचला, मला भिडला. कॉस्मोपॉलिटन शहरांमधल्या सार्वजनिक वाहतूकव्यवस्था आणि इतर इन्फ्रास्ट्रक्चर्स, लेखन-वाचन-सिनेमे-नाटकं-शिक्षण-परिसंवाद इत्यादी सारस्वती वर्तुळं, उच्चवर्णीय समाजातल्या जन्मामुळे आणि सुधारकी कुटुंबांमुळे परंपरांशी झगडावं न लागता त्यांचे फायदे तितके मिळणं नि तरी त्यांकडे पाहायची जबाबदार नजर म्यान न करता येणं, स्त्रीत्वाचा अहं वा न्यून असा कुठलाच गंड नसणं... हे सगळं मॅचिंग असल्यामुळे - वा निदान हवंहवंसं असल्यामुळे – ती मला एखाद्या समवयस्क मैत्रिणीसारखी भासली.
पुढे अतिशय आवडीनं मिळवलेल्या तिच्या सगळ्या लेखनात तिचा हाच स्वभाव बर्करार राहिलेला जाणवला. उतारवयात किडण्या निकामी झाल्यावर करावं लागलेलं किडणीचं रोपण, त्यासाठी मित्रपरिवारातून आर्थिक बळ मिळवणं, ते करताना मिंधेपण न येऊ देणं, सतत विवेकी दृष्टीकोनातून आपल्या कृतींची योग्यायोग्यता तपासत राहणं, तसं करताना किडणीच्या आजारपणाचे तपशील-त्याबाबतची सामाजिक-वैद्यकीय निरीक्षणं-आत्मपरीक्षण नोंदणं... हे सगळं लीलया कवेत घेणारं ‘हसरी किडणी’ हे पुस्तक काय; किंवा अण्वस्त्रनिर्मितीचा इतिहास अशा ढोबळ वर्णनात कसंबसं(च) बसेल असं ‘बाराला दहा कमी’ हे पुस्तक काय. विवेकी-अभ्यासू-व्यापक-आधुनिक नजर आणि त्याच वेळी स्वभावातला गमत्येपणा ही तिच्या लिहिण्याची व्यवच्छेदक लक्षणं. बायका आणि दागिन्यांशी असलेले त्यांचे (आणि तिचे स्वतःचे) संबंध, दगडांची झाडं बनवण्याची खास अमेरिकी कला, तिच्या आजारपणात तिला आलेले काही अतींद्रिय अनुभव आणि खास पद्मजा-पद्धतीत शोधलेली त्यांची वैज्ञानिक स्पष्टीकरणं, लहान मुलांचं साहित्य, आइनस्टाइनचं घर... यांवरचं तिचं लिहिणं आजारपणानंतर आणि वाढतं वय जमेस धरूनही विलक्षण ताजं-तरुण होतं. 'स्मायली', 'टेडी बेअर', ओरिगामीत भेटणारा जपानी करकोचा अशा गोष्टींवर लिहून त्यांच्याशी आधुनिक समाजांचे असलेले लडिवाळ संबंध उलगडून दाखवावेत, तर ते तिनंच.
मराठीत सशक्त स्त्रीवादी ललितलेखनाची परंपरा आहे. त्यांच्याशी तुलना करता काय दिसतं? गौरी जवळ जवळ परग्रहावरची वाटावी अशा जगातली भासणारी. तिच्या साहित्यातल्या विश्वाला मराठी मध्यमवर्गीय मर्त्य जगाचे नियम जणू लागूच नाहीत. सानिया कमाल गंभीर आणि अनेकदा वाचकावर विसंबून अनेक गोष्टी न उच्चारता सोडून देणारी. मेघना पेठेचं नातं मला गौरी वा सानिया यांच्यापेक्षाही जी. ए. कुलकर्णींशी अधिक जवळचं वाटतं. पद्मजाच्या लिहिण्यात आणि जीवनदृष्टीत एक प्रकारचा रसरशीतपणा, जीवनसन्मुखता, निकोपता दिसते - लोभस वाटते.
आमच्यात इतकं सगळं मॅचिंग नसतं नि मी एखाद्या खेड्यात जन्मलेली, शिक्षण घेणार्या पहिल्याच पिढीतली, पारंपरिक स्त्री – किंवा अगदी पुरुषच असते – तर आमची अशी नि इतकी मैत्री झाली असती का? कदाचित झाली असतीही. पण मी तिला एकेरीत संबोधू शकले नसते. तितकं अंतर तरी आमच्यात राहिलंच असतं.
~
दिवेलागणी
पद्मजा फाटक
विमल प्रकाशन
१९८८

(पूर्वप्रसिद्धी : आदले-आताचे, लोकरंग, लोकसत्ता, जून २०२३)

बुजरी गाणी ०९

हे गाणं सगळ्यांत आधी मुंबईतल्या पावसाचं आहे. मग त्यातल्या प्रेमिकांचं.
भेटायचं ठरलंय. सगळीभर उत्कंठा, हुरहुर, अधीरता भरून राहिल्यासारखी. आणि पाऊस. आणि आधी पिवळ्याधम्मक फ्रॉकमधली नि मग जांभळ्या-पांढऱ्या कुर्त्यातली सोनाली बेंद्रे. आणि तसाच लालबुंद शर्टातला अक्षय खन्ना. दोघेही कोवळे, नखशिखान्त भिजलेले-ओले, आतुर.
त्यानं तिला काहीतरी नाजूकशी भेटवस्तू निवडताना मनातल्या तिलाच पसंती विचारावी आणि तिनंही ती नाक उडवत सांगावी. सजून तयार होताना तिच्या मनातल्या त्यानं तिच्या गालांवर हलकेच ओठ टेकावेत...
नि तरी भेट अजून घडायचीच आहे बरं का. वाटेत मुंबईचा पाऊस आडवा आला आहे!
तुंबून पडलेल्या टॅक्स्या, रस्त्यांवरचे खड्डे, रिक्षातून उतरून धक्का मारावा लागणं, बसनं एखाद्या खड्ड्यात चाक घालून अंगावर चिखलाची चिळकांडी उडवणं... असा शहरी पाऊस. चक्क रोडरोलर चालवत-गवळ्याच्या सायकलवरून-कुणाकुणाच्या स्कूटरच्या साइडकारमधून-हातगाडीवरून... कुणाकुणाकडून लिफ्ट्स घेत घेत केलेला प्रवास. मुंबईचा ट्रेडमार्क म्हणता येतील अशा यच्चयावत गोष्टी... मिश्कील हसणाऱ्या कोळणींपासून ते लोकल रेल्वेच्या स्टेशनांपर्यंत, नि मरीन ड्राइव्हवरच्या लाटांपासून ते हातात न ठरणाऱ्या छत्रीपर्यंत. नाही म्हणायला यात क्रिकेट नाही. पण ती उणीव पावसात फुटबॉल खेळणाऱ्या पोरांनी भरून काढलीय.
सगळ्या अडचणींवर मात करत, बंद पडलेल्या शहराला न जुमानता, कधी हट्टानं तर कधी चुचकारत, भिजत-हसत.. दोघं एकमेकांना संकेतस्थळी भेटतात नि आपल्यालाच एकदम भारी वाटून जातं!
२६ जुलै घडण्यापूर्वीच्या काळातलं हे गाणं. 'दर वर्षी एकदा गाड्या बंद पडतातच. उसमें क्या हय!' असं म्हणत पावसाला कोलणाऱ्या मुंबईकरांचं. त्यामुळे आणि त्यातल्या प्रेमिकांच्या कशा-कशानंही न विरजणाऱ्या उत्फुल्ल मूडमुळे हे गाणं टवटवीत - चिरतरुण - हसरं भासतं. हिंदी गाण्यांतल्या पावसाची आठवण निघताक्षणीच तत्काळ दाराशी येऊन 'हॅलो!' करतं.
आता त्याचीही आठवण काढून झाली. आता तरी पाऊस यावा बा.

सावन बरसे, तरसे दिल, क्यों ना निकले घर से दिल
बरखा में भी दिल प्यासा है, ये प्यार नहीं तो क्या है
देखो कैसा बेकरार है भरे बाजार में
यार एक यार के इंतजार में
एक मोहब्बत का दीवाना, ढूंढता सा फिरे
कोई चाहत का नज़राना, दिलरुबा के लिये
छमछम चले पागल पवन,
आये मज़ा भीगे बलम
भीगे बलम, फिसले कदम, बरखा बाहर में
एक हसीना इधर देखो कैसी बेचैन है
रास्तेपर लगे कैसे उस के दो नैन है
सच पूछिये तो मेरे यार,
दोनों के दिल बेइख्तियार
बेइख्तियार, है पहली बार, पहली बहार में
(शब्द इंटरनेटवरून ढापले आहेत, चूकभूलदेणेघेणे.)

बुजरी गाणी ०८

हे गाणं दिसायला चार गाण्यांहून वेगळं नाही. प्रियकर आणि प्रेयसी. फुलं. बागा. आवेग. पडद्यावर न दाखवता सुचवलेली चुंबनं. प्रणयाची पहिली रात्र. इत्यादी. पण तरीही ते डोक्यात रुतून का बसलं आहे, याचा विचार केला तर सगळ्यांत आधी आशाचं नाव समोर आलं. ऐंशी सालातला हा सिनेमा. त्या दशकात तिच्या आवाजाचा पोत कसा आहे, ते तिची त्याच दिवसांमधली एकाचढ एक गाणी पाहिली तरी कळेल. पण या गाण्यात – या गाण्यात तिचा आवाज एखाद्या खळाळत्या झर्यासारखा किलबिलत, खळाळत, मोकळेपणी वाहिला आहे. त्यातल्या ताजेपणानं चकित व्हायला होतं. दुसरं कारण म्हणजे शब्द. चार सरळसोट प्रणयी गाण्यांसारखे हे शब्द नव्हेत. दीवाना, इश्क, जुनून, प्यारमोहोब्बत इत्यादी ठरीव ठोकळ्यांची सवय असलेली आमची पिढी. त्या पार्श्वभूमीवर कानी आलेले या गाण्याचे शब्द त्यांच्या वेगळेपणाची दखल घ्यायला लावतात.
ही सगळी स्वप्नं सत्यात उतरतील, तू फक्त हो म्हण – असे ते शब्द. तेही ठीक. तिचं त्याला दिलेलं उत्तर मात्र निराळं आहे. ‘मोहोब्बतों में दोनों का एकही मतलब’! म्हणजे स्वप्न आणि सत्य यांचा अर्थ एकच आहे? की हो आणि नाही यांचा अर्थ एकच आहे?! दोन्ही अर्थ लागू पडतातच की. असं वाटून आपण चकित होऊन कवी कोण आहे बरं, असा विचार करू लागतो न लागतो, तोच ‘अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो’ असं स्पष्टीकरण येतं. म्हणजे नखरेलपणे दिलेला नकार नि हसून दिलेला होकार एकच, प्रेम असलं पाहिजे फक्त? वा! काय खेळ आहे शब्दांचा! पण - पण - पण हे ‘No is a complete sentence.’ हे पुरुषांना बजावावं लागण्याआधीच्याच काळात परवडू शकलं असणार, असंही वाटतं नि कवीबद्दल आणखीनच उत्सुकता वाटते. शोधल्यावर शब्द इतके का वेधक वाटावेत त्याचं उत्तर स्वयंस्पष्ट असल्यासारखा जबाब – साहिर. आश्चर्य समाप्त!
या शब्दांचं आणखीही एक वैशिष्ट्य आहे. ‘स्त्रीला शृंगारात अॅक्टिव रोल असता कामा नये’ या हिंदी सिनेमाच्या नियमानुसार मधुचंद्राच्या रात्री डोळ्यांत मेलेल्या माशासारखे भाव घेऊन बसलेली निर्विकार पुतळा नायिका गाण्यात हजेरी लावून जाते खरी. पण शब्द मात्र या डरपोकपणाला न जुमानणारे आहेत. ‘तुम्हारे बाहों के झूले में झूलने के लिए, मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये हैं’, किंवा ‘तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल, अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी’, किंवा 'मैं सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर'. नक्की काय वाटतंय, वाटेल, याबद्दल कुठलाही संदेह नाही! गाण्यातला फक्त प्रियकरच शृंगारासाठी आतुर झालाय आणि प्रेयसी हिप्पोगिरी करून लाडिक, लटकं नाही म्हणतेय – या सरधोपटपणाशी पूर्णतः फटकून असलेला आतुरतेचा स्पष्ट, थेट उच्चार.
घाई नसलेली, संथ, सुरेल सुरावट आणि दर कडव्यात तिसर्या ओळीला बदलून चकित करणारा टेम्पो. सिनेमा कितीही बटबटीत असला, साथीला महेंद्र कपूरचा आवाज असला, प्रियकराच्या भूमिकेतला नट कितीही साबणवडीसदृश असला – तरीही हे गाणं लक्ष्यात राहतं.



हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
मुहबतो में है दोनों का एक ही मतलब
अदा से ना कहो या मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
हज़ार ख्वाब बहारों के और सितारों के
तुम्हारे साथ मेरी ज़िंदगी में आये है
तुम्हारी बाहों के झूले में झूलने के लिए
मचल मचल के मेरे अंग गुनगुनाये है
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
भरेगी मांग तुम्हारी वो दिन भी क्या होगा
सजेगी सेज हवाओं की साँस मेहकेगी
तुम अपने हाथ से सरकाओगे मेरा आंचल
अजीब आग मेरे तन बदन में देहकेगी
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
में अपनी जुल्फों के साये बिछाऊँगी तुमपर
में तुमपे अपनी जवाँ धड़कनें लुटाऊंगा
में सुबह तुमको जगाउंगी लब पे लब रख कर
में तुमको भींचके कुछ और पास लाउंगा
ये सारे शौक सारे शौक
ये सारे शौक सदाकतका रूप ले लेंगे
मगर ये शर्त है तुम मुस्कुरा के हाँ कह दो
हज़ार ख्वाब हक़ीक़त का रूप ले लेंगे
(गाण्याचे शब्द नेटवरून उचललेले आहेत, प्रमाणलेखनाची चूकभूल माफ असावी.)

इतक्यात वाचलेली पुस्तकं : अर्ली इंडियन्स


सुमारे पासष्ट हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून निघालेली काही आदिमाणसं भारतीय उपखंडात आली. काही युरोपात गेली. पण ‘अर्ली इंडियन्स’ हे टोनी जोसेफ लिखित पुस्तक इतरत्र गेलेल्या माणसांकडे फार निरखून बघत नाही. त्याचा रोख आहे तो भारतीय उपखंडातल्या माणसांच्या इतिहासाकडे.
ही आदिमाणसं भारतीय उपखंडात कुठे-कुठे स्थिरावली. पण सुमारे पाचेक हजार वर्षांपूर्वीपर्यंत शेतीचा शोध लागला नव्हता. लोक नुसतेच भटकत, शिकार-सावड करत जगत होते. साहजिक पोटापलीकडचं उत्पन्न नव्हतं आणि त्यामुळे संस्कृतीही नव्हती. पण पाचेक हजार वर्षांपूर्वी इराणमधल्या झाग्रोस नामक डोंगराळ भागातली काही माणसं आपण ज्याला हडप्पा संस्कृती म्हणतो त्या भागापर्यंत आली असावीत. आत्ताच्या भारतातला गुजरात नि आसपासचा भाग, पलीकडचा पार बलुचिस्तानपर्यंतचा भाग, आणि अलीकडे अगदी गंगा-यमुनेच्या संगमापर्यंतचा भाग असा विस्तीर्ण भूभाग हडप्पा संस्कृतीचा मानला जातो. पण हा त्याचा विस्तार पुढच्या दीडेक हजार वर्षांमध्ये झालेला. तर – भारतात राहू लागलेली आफ्रिकी आदिमाणसं नि इराणच्या झाग्रोसमधून आलेले लोक एकत्र राहू लागले असावेत. त्यांच्या वंशजांनी हडप्पा संस्कृती वाढवली. तत्कालीन पृथ्वीवरची ही सगळ्यांत मोठी संस्कृती – भूभागाचा आकार नि लोकसंख्या अशा दोन्ही अर्थांनी. (तरी लोकसंख्या फार तर भारतातल्या आजच्या एखाद्या सेमीशहराएवढी असेल! हे ‘प्रचंड’ लोकसंख्येचा आवाका ध्यानी यावा म्हणून.) शेतीवर आधारित जीवनशैली, मोठाल्या देवळांची अनुपस्थिती, हिंसा वा संघर्ष यांचं चित्रण अजिबात न सापडणं, राजापेक्षाही निवडक उच्चवर्णीयांच्या हाती कारभार असल्यासारखी लक्षणं, पाण्याचं नि सांडपाण्याचं उत्तम नियोजन, नद्यांना बंधारे घालून आणि पूरनियंत्रण करून खेळवलेलं पाणी, रस्ते-स्नानगृहं, इत्यादींमधली शास्त्रशुद्ध गुंतवणूक, शिस्नपूजा, युनिकॉर्नसदृश्य प्राण्याचं पूजन, हंडी उर्फ लोटा या नमुन्याच्या भांड्याची निर्मिती आणि प्रसार, तत्कालीन जागतिक संस्कृतींशी व्यापार, बांगड्या या दागिन्याचं प्राबल्य, घोडा या प्राण्याची अनुपस्थिती तर रेडा-म्हैस या प्राण्याला असलेलं महत्त्व, मातृदेवतांची उपासना… या काही गोष्टी हडप्पा संस्कृतीचे विशेष म्हणून मानल्या जातात. तीनेक हजार वर्षांपूर्वी काही एकापाठोपाठ एक आलेल्या नैसर्गिक आपदांमुळे तिचा र्हास होऊ लागला. वसवलेली नगरं सोडून लोक परागंदा झाले. जगायला इतर भूभागात गेले. त्यांच्यापैकी काही लोक भारताच्या दक्षिणेकडे गेले. दक्षिणेत आधीही स्थलांतरं झाली असणारच. पण हे महत्त्वाचं स्थलांतर असणार. हडप्पा संस्कृतीच्या लिपीचा आजही पूर्ण उलगडा झालेला नसला, तरी दक्षिण भारतातल्या द्रविडभाषांची आदिभाषा आणि हडप्पामधली आदिभाषा यांच्यात म्हणण्याजोगी साम्यं आढळली आहेत.
हडप्पा संस्कृतीचा र्हास अंतिम टप्प्यात असताना कधीतरी स्टेप्समधून – गवताळ कुरणांच्या प्रदेशातून काही टोळ्या या दिशेनं आल्या. त्यांची जीवनशैली भटकी होती. घोडा हा प्राणी त्यांच्याकरता साहजिकच अतिमहत्त्वाचा होता. धातुकाम आणि पर्यायानं शस्त्रास्त्रं याही बाबतीत ते प्रगत असावेत. गुराढोरांना महत्त्व होतं, पण एका जागी स्थिरावून नगरं वसवणारे ते लोक नव्हते. आपण ज्यांना ‘आर्य’ म्हणतो ते हे लोक असावेत. तोवर वेदनिर्मिती झालेली नव्हती, तसंच संस्कृतही पूर्ण विकसित नव्हती. त्या दोन्ही बाबी या प्रदेशात आल्यानंतर घडल्या. पण त्यांच्या संस्कृतीत – बहुधा येताना अफगाणिस्तानात वाटेत आलेल्या हरवैती – सरस्वती? – नदीला महत्त्व होतं. नद्यांना बांध घालणं पाप मानलं जात असावं. शिस्नपूजेबद्दल तिरस्कार होता. आणि मुख्य म्हणजे हे लोक पुरुषबहुल टोळ्यांतून आले.
आधीच र्हासकालात असलेल्या हडप्पा संस्कृतीला हा संघर्ष पेलवला नसावा. आर्य पुरुषांनी इथल्या स्त्रिया मिळवणं, त्यातून वंश वाढवणं, हळूहळू वेदरचना होत जाणं, संस्कृतची प्रगती होत असतानाच स्त्रिया (कारण त्या बहुतांश परक्या वंशातल्या!) आणि शूद्र (हडप्पातले, उर्फ परके) यांच्या संस्कृत बोलण्यावर बंधनं असणं, यज्ञ-बळी-युद्ध इत्यादी संस्कृतीच्या केंद्रस्थानी असणं… हे यथावकाश घडत गेलं. आजच्या भारताच्या वरच्या भागात डावीकडून उजवीकडे एखाद्या उथळ यूसारखा एक रुंद पट्टा ओढला, तर जो आकार मिळेल, साधारण त्या भागात आर्यांची संस्कृती बहरत गेली. त्या-त्या प्रदेशातल्या इंडो-युरोपीय भाषांचा अभ्यास या स्थानाला पुष्टी देतो.
हडप्पा आणि आर्य या दोहोंची वैशिष्ट्यं एकत्र येत राहिली. सुरुवातीला शिस्नपूजेचा तिरस्कार करणार्या आर्यांनी शिवलिंग स्वीकारलं. हडप्पा संस्कृतीमधली हठयोग्याची मुद्रा आणि योग स्वीकारला. आधीच्या हडप्पाजनांची मातृदेवतांची उपासना मागे पडली. त्यांनी यज्ञयाग आपलेसे केले. संस्कृत आणि वेद आपलेसे केले. या सगळ्या काळात भारतीय उपखंडात जगभरातून इतरही स्थलांतरं होतच होती. कुठे-कुठे मूळ आफ्रिकी वंशाचे ‘अर्ली’ भारतीय लोकही होते. या सगळ्यांमध्ये ‘मुक्त संचार नि संकर’ घडत होता. हा ‘भारतीय’ संस्कृतीचा सर्वांत सर्जनशील कालखंड. उपनिषदनिर्मितीचा कालखंड. मुक्तविहाराचा, मिश्रणाचा, विविधतेचा, विपुलतेचा आणि निर्मितीचा कालखंड.
इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षं कधीतरी वर्णसंकर थांबलेला आढळतो. त्यावर बंदी तरी आली असावी वा वर्णसंकरात काहीतरी चूक आहे अशी समजूत जनमानसात रुजली असावी – रुजवली गेली असावी. मजेशीर बाब अशी की वेदांत आढळणारी चातुर्वण्याची संकल्पना तत्कालीन समाजात अस्तित्वात असूनही त्याआधी वर्णसंकर थांबलेला दिसत नाही. तसे ठोस जनुकीय पुरावे आता मिळाले आहेत. इसवीसनापूर्वी शंभरेक वर्षांपूर्वी तो थांबला. त्या सुमारास जातिव्यवस्थेचा उदय झाला असावा, असं म्हणता येईल.
इतिहासाच्या पटाच्या तुलनेत वर्णसंकर निषिद्ध मानण्याची घटना तशी अलीकडची (!) असल्यामुळे भारतीय लोकांमध्ये जनुकीयदृष्ट्या फरक नाही. थोडं वैविध्य आहे, पण आपण सगळे जण थोडे थोडे सगळ्यांसारखेही आहोत. आफ्रिकी वंशाचे भारतीय, आ०वं०भा० + झाग्रोसमधले शेतकरी = हडप्पा, हडप्पा + आ०वं०भा०= द्रविड उर्फ दक्षिण भारतीय, हडप्पा + आर्य = उत्तर भारतीय, भारताच्या ईशान्येकडून आलेले मंगोल वंशीय आणि त्यांचे इतरांशी झालेले संकर, आणि या सगळ्यांचे आपापसांत झालेले संकर... असा भारतीयांचा जनुकीय आणि पर्यायानं सांस्कृतिक-सामाजिक इतिहास आहे. एका पिझ्झ्याची अतिसुलभीकृत (हा लेखकाचाच शब्द) उपमा देत ही घडण समजावली जाते. खालचं पीठ आ०वं०भा०चं, वरचा सॉस हडप्पाचा, चीज आर्यांचं, तर इतर लोकांचे टॉपिंग्स – असं सगळं मिळून आपण उर्फ आजचा आपला पिझ्झा घडलेला आहे.
हा सगळा पट ‘अर्ली इंडियन्स’च्या पूर्वार्धात उलगडतो. त्याकरता पुरातत्वशास्त्र, मानववंशशास्त्र, जनुकशास्त्र, भाषाशास्त्र, शिलालेखन-ताम्रपट आणि बोलींचा इतिहास, इतर सांस्कृतिक-सामाजिक इतिहासलेखन – या सगळ्यांची मदत घेतली जाते. मात्र गेल्या पाचेक वर्षांपूर्वींपर्यंत या सगळ्या इतिहासात असलेली संदिग्धता संपवून ठोस नेमकेपणा आणि अचूकपणा आणण्याचं काम प्राचीन जनुकीय पुराव्यांनी केलं असल्याची ठाम नोंद होते.
ही गोष्ट अत्यंत दिलखेचक तर आहेच. त्याखेरीज ती आपल्याला विचारात पाडते. हा हजारो वर्षांचा इतिहास ओलांडून बघता बघता आजच्या भारतातल्या उत्तर विरुद्ध दक्षिण अशा संघर्षांपर्यंत येऊन ठेपते. ब्राह्मणवाद आणि बहुजनवाद यांची मुळं दाखवून देते. शाकाहार आणि मांसाहार, दुग्धसेवन आणि मांसाशन यांमागच्या जनुकीय कारणांवर प्रकाश टाकते. गांधी-आंबेडकर वादाची मुळं शोधू पाहते. मगध आणि आर्यवंशीय यांच्यातल्या संघर्षाची कारणं पाहते. बुद्ध नि जैन धर्मांच्या उदयामागची नि प्रसारामागची पार्श्वभूमी दाखवून देते... आणि या सगळ्या द्वैतांच्या पलीकडे जाणारी – या भूमीतल्या वैविध्यात नांदणार्या एकात्मतेचा, मिश्रणाचा, संकराचा, संगमाचा, सहजीवनाचा... आणि त्यातून निर्माण झालेल्या अद्वितीय वारशाचा धागा दाखवते.
वाचताना पुष्कळ काही पूरक आठवत, दिसत राहिलं. त्यानं या गोष्टीला अनेक आधार पुरवले. उदाहरणं दिली. स्पष्टीकरणं दिली. दिलासाही दिला. पुस्तक अतिशय अतिशय आवडलं हे तर सांगायला नकोच. ते सतत निरनिराळ्या कारणांनी डोक्यात पृष्ठभागापाशीच राहील, पुन्हापुन्हा त्याकडे संदर्भाला, तुलनेला परतणं होईल – हे महत्त्वाचं. आणि तसं दुर्मीळ.
बाकी – हा निव्वळ न राहवून करून दिलेला परिचय आहे. तपशिलात काही चूक असेल, तर ती माझी.
~
अर्ली इंडियन्स : द स्टोरी ऑफ अवर अॅन्सेस्टर्स अॅंड व्हेअर वी केम फ्रॉम
टोनी जोसेफ
प्रथमावृत्ती 2018
जगरनॉट पब्लिकेशन

इतक्यात वाचलेली पुस्तकं : एका श्वासाचं अंतर

अंबिका सरकारांबद्दल निरनिराळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. पोटच्या तिन्ही मुलांचा मृत्यू पाहावा लागणं. अर्थशास्त्राचं अध्यापन. सळसळता उत्साह. गौरी देशपांडेशी असलेली मैत्री आणि तिच्या तोंडचं ‘माझी अंबू’ हे संबोधन. ‘द रीडर’चं अंबिकाबाईंनी केलेलं भाषांतर. ते भाषांतर आणि सिनेमा या दोन गोष्टी अजिबात वेगळ्या न काढण्याजोग्या एकमेकींवर सुपर इंपोज झाल्यासारख्या होत्या डोक्यात.
पण या सगळ्या ओळखी ओलांडून त्यांची ओळख माझ्या डोक्यात कायम ‘एका श्वासाचं अंतर’ लिहिणारी लेखिका अशीच राहील.

कथानक अगदी साधं सरळ आहे त्या कादंबरीचं. एक कमावती बाई. एक मुलगा झाल्यानंतर नवर्याच्या नादानपणाला कंटाळून वेळीच घटस्फोट घेते. लोकांची बरीवाईट, शहाणी-कुजकी बोलणी झेलते, पचवते. दुसरं लग्न करते. संसार करते, यथाशक्ती निभावते. मरून जाते. यापल्याड त्या पुस्तकात विशेष सांगण्याजोग्या घटना नाहीत. पुस्तक संपल्यावर हे जाणवतं, तेव्हा चकित व्हायला होतं. कारण या सरळसाध्या आयुष्यात किती काय-काय प्रवास घडतात त्या बाईचे! जराही मेलोड्रामा न वापरता, उत्कटतेचे रंग गडद न करता, माणसांना काळ्या-पांढर्या रंगांमध्ये न रंगवता, स्त्रीवाद या शब्दातला ‘स’ही न उच्चारता, तटस्थतेचा आव न आणता – आयुष्याबद्दलच बोलणारी गोष्ट इतक्या परिणामकारकपणे कशी काय लिहू शकतं कुणी, असं वाटतं.
यातली सगळीच पात्रं हाडामांसाची माणसं आहेत. नायिकेचा दुसरा नवरा – बाप्पा, त्यांचा अश्राप चांगुलपणा आणि तरीही कुणापर्यंतच न पोचता येण्यातला अभागीपणा बघताना पोटात तुटतं. मुलाचं - कार्तिकचं - आईवर उत्कट प्रेम आहे. आणि तरी एक प्रकारचा हट्टी आक्रसलेपणाही आहे. तो त्याला आईपल्याड कुणापर्यंतच धड पोचू देत नाही. त्याच्या बायकोचा - रेखाचा - स्वतःचा असा इतिहास-भूगोल आहे. त्यातून येणार्या तिच्या धारणा आहेत. त्यांची नि तिच्या नवर्याच्या स्वभावाची अशी काही करकचून गाठ बसलेली आहे, की संसार सोन्यासारखा, नातं घट्ट, दोन गोजिरवाणी मुलं, एकमेकांबद्दल प्रेमही आहे - पण कुठेतरी काही विस्कटून बसलेलं...
या सगळ्या गुंत्याकडे नायिका साक्षीभावानं पाहते. तिला त्या-त्या वेळी दुःखं होतात, राग येतो, माया वाटते, काळजी वाटते. पण त्यापल्याड बघणारी नजर तिच्यापाशी आहे. त्यानं सगळ्यांमधली असूनही ती निराळी होते.
तिच्या ऑफिसातल्या एका सहकार्याचं – नवलकरचं - एक पात्र कादंबरीत आहे. मनमोकळेपणी चावट कोट्या करणारा, सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा, भरभरून जगणारा असा तो माणूस. त्याच्या बोलण्यामुळे त्याच्यापासून फटकून राहिलेल्या नायिकेला एका क्षणी त्याच्या वाह्यात बोलण्यापल्याडची खरीखुरी आस्था, जगण्यावरचं प्रेम जाणवतं. धागा जुळल्यासारखा होतो, काहीतरी चमकून गेल्यासारखं होतं.
तिथेच लेखिका थांबते.
आपण थांबून अर्थ लावू पाहतो, पण गोष्ट पुढचं वळण घेते.
असे अनेक क्षण गोष्टीत येतात. अर्थपूर्णता आणि निरर्थकता यांच्यातला लपंडाव घडत राहावा, माणसांनी सर्वस्व पणाला लावून जगू पाहावं आणि भ्रमनिरास व्हावा, पण काहीतरी सापडल्यासारखंही व्हावं. थबकून काही चिमटीत धरू पाहण्याआधीच आयुष्यानं पुढचं वळण घ्यावं - असे ते क्षण. बघता-बघता निसटून जाणारे, जगण्या-मरण्यातलं अंतर दाखवून देणारे.
हे अनलंकृत, जिवंत, कसलाही आव न आणणारं, शहाणं पुस्तक लिहिणारी लेखिका म्हणून अंबिकाबाईंची जागा कायम मनात राहील. त्यांना आदरांजली.
एका श्वासाचं अंतर
अंबिका सरकार
मौज प्रकाशन
प्रथमावृत्ती १९९०